प्रतिनिधी अमित मुंडीक
Pune Crime : पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट–३ ने मोठी कारवाई करत रेकॉर्डवरील गुन्हेगाराला गावठी पिस्टल, मॅगझीन आणि तीन जिवंत काडतुसांसह अटक केली आहे. ही कारवाई २ जानेवारी २०२६ रोजी पर्वती व सिंहगड रोड पोलीस स्टेशन हद्दीत करण्यात आली.

गुन्हे शाखा युनिट–३ चे अधिकारी व कर्मचारी वरिष्ठांच्या आदेशानुसार पाहिजे आरोपी व रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी करत पेट्रोलिंग करत असताना दांडेकर पूल, दत्तवाडी परिसरात पोहोचले. यावेळी गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे पूर्वेश ऊर्फ सार्थक दिनेश चव्हाण (वय २२, रा. हिराबाग चौक, शुक्रवार पेठ, पुणे) हा इसम अवैधरित्या गावठी पिस्टल, तीन जिवंत काडतुस व रिकामी मॅगझीन बाळगत असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी भारत पेट्रोलसमोरील गल्ली, टिळक रोड, पुणे येथे सापळा रचून शिताफीने त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक गावठी पिस्टल, एक रिकामी मॅगझीन आणि तीन जिवंत काडतुस जप्त करण्यात आले. पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपीस खडक पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदर कारवाई ही अपर पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) पंकज देशमुख, पोलीस उप-आयुक्त निखिल पिंगळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट–३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम राजमाने व त्यांचे सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यशस्वीपणे पार पाडली.







