पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कुख्यात गुंड गज्या मारणे याच्या (Gaja Marane) पत्नीला उमेदवारी देण्यात आल्याने सध्या (Pune Mahapalika Election) जोरदार राजकीय टीका सुरू आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी या निर्णयामागील भूमिका स्पष्ट करत आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. (Latest Marathi News)

सुरुवातीला संबंधित जागा ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते सचिन खरात यांच्यासाठी देण्यात आली होती. सचिन खरात यांनी त्या ठिकाणी उमेदवारी दिल्याचे अजित पवार यांनी यापूर्वी सांगितले होते. मात्र या मुद्द्यावरून गैरसमज पसरवले जात असल्याचा आरोप होत असताना, आज अजित पवार आणि सचिन खरात यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट करत, संबंधित उमेदवाराला संधी देण्याचा निर्णय हा सचिन खरात यांचाच असल्याचे ठामपणे सांगितले.
अजित पवार म्हणाले की, सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या याद्या पाहिल्या तर अनेक ठिकाणी वादग्रस्त पार्श्वभूमी असलेली नावे आढळतात. मित्रपक्षांना काही जागा देणे ही युतीतील प्रक्रिया असून त्या जागेवर कोणाला उमेदवारी द्यायची, हा पूर्णपणे संबंधित पक्षाचा अधिकार आहे. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसकडून थेट उमेदवारी देण्यात आलेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी अजित पवार यांनी आणखी एक महत्त्वाची भूमिका मांडत सांगितले की, एखाद्या व्यक्तीवर गुन्हेगारी आरोप असतील तर त्याची जबाबदारी संपूर्ण कुटुंबावर टाकणे योग्य नाही. पतीने गुन्हा केला असेल तर त्याची पत्नी, मुले किंवा कुटुंबीय दोषी ठरत नाहीत. एखाद्याने गंभीर गुन्हा केला म्हणून त्याचे संपूर्ण खानदान जबाबदार आहे, अशी मानसिकता ही विकृती असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
या वक्तव्यामुळे अजित पवार यांनी केवळ उमेदवारीच्या निर्णयाचेच समर्थन केले नाही, तर गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि कुटुंबीयांची जबाबदारी यावरही स्पष्ट भूमिका मांडली आहे.







