Wagholi Suicide News: वाघोली : पुणे शहरातील वाघोली परिसरातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. भावडी रस्त्यावरील एका सोसायटीमध्ये 18 वर्षांच्या तरुणीने इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली. ही घटना 28 फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे 12.30 वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मृत तरुणीचे नाव सारा लालमन अंधारे असून ती मूळची करमाळा तालुक्यातील आहे. गेल्या एक वर्षांपासून ती आपल्या आईसोबत वाघोली येथे मामाच्या घरी राहत होती. ती अकरावी इयत्तेत शिक्षण घेत होती. शनिवारी दुपारी ती लिफ्टने इमारतीच्या आठव्या मजल्यावर गेली. तेथील रिफ्युज गॅलरीमध्ये जाऊन तिने चप्पल काढली आणि खाली उडी घेतल्याची माहिती समोर आली आहे.
रागाच्या भरात टोकाचं पाऊल
घटनेची माहिती मिळताच वाघोली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी अवस्थेत तिला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. प्राथमिक माहितीनुसार, रागाच्या भरात तिने हे पाऊल उचलले असावे असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. कुटुंबीय आणि ओळखीच्या व्यक्तींची चौकशी केली जात आहे. तरुण वयात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

