Israel Iran tension: पुणे : मध्यपूर्वेत इस्रायल आणि इराण यांच्यात वाढलेल्या तणावाचा परिणाम पुण्यातील (Pune Students) विद्यार्थ्यांवर झाला आहे. ताथवडे येथील इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ स्कूल ऑफ बिझनेस (Indira Institute of School of Business) या महाविद्यालयाचे 80 विद्यार्थी आणि 4 शिक्षक असे एकूण 84 जण सध्या दुबई येथे अडकले आहेत. आखाती देशांतील परिस्थिती तणावपूर्ण झाल्यामुळे काही हवाई मार्ग तात्पुरते बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांचा परतीचा प्रवास पुढे ढकलला गेला आहे.

विद्यार्थ्यांचा दौरा
हे सर्व विद्यार्थी अभ्यास दौऱ्यासाठी दुबईला गेले होते. नियोजनानुसार ते शनिवारी आणि रविवारी दोन टप्प्यांत भारतात परतणार होते. मात्र आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर परिणाम झाल्याने त्यांना तिथेच थांबावे लागत आहे. अचानक बदललेल्या परिस्थितीमुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
विद्यार्थी आणि शिक्षक सुरक्षित
महाविद्यालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार सर्व विद्यार्थी आणि शिक्षक सुरक्षित आहेत. ते दुबईतील मध्य भागात राहत असून त्यांच्या निवास आणि अन्नाची योग्य व्यवस्था करण्यात आली आहे. दुबईतील भारतीय दूतावासाचे अधिकारी त्यांच्या संपर्कात आहेत. विद्यार्थ्यांनी घाबरू नये आणि पालकांनीही शांत राहावे असे आवाहन महाविद्यालयाकडून करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांना आणण्यासाठी यंत्रणा सज्ज
विद्यार्थ्यांना लवकरात लवकर भारतात आणण्यासाठी संबंधित यंत्रणा प्रयत्न करत आहेत. हवाई वाहतूक सुरू होताच त्यांना उपलब्ध मार्गाने परत पाठवले जाईल. गरज पडल्यास विशेष व्यवस्था करण्याबाबतही चर्चा सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.




