पुणे: वाशिममधील बारावी परीक्षेतील सामूहिक कॉपी प्रकरणात 27 जणांवर गुन्हे दाखल झाल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली असतानाच पुण्यातूनही धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील धायरी परिसरातील एका बारावी परीक्षा केंद्रावर शिक्षकानेच विद्यार्थ्यांना कॉपी पुरवल्याचा आरोप समोर आला असून, शाळेचा निकाल 100 टक्के लागावा यासाठी हा प्रकार केल्याची चर्चा रंगली आहे.

राज्य मंडळाने दहावी-बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त आणि पारदर्शक वातावरणात पार पडाव्यात यासाठी कडक नियम लागू केले आहेत. परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही, भरारी पथके आणि स्वतंत्र निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. तरीही काही ठिकाणी नियमांना हरताळ फासल्याचे प्रकार उघड होत आहेत.
बुधवारी झालेल्या रसायनशास्त्राच्या पेपरदरम्यान संबंधित शिक्षकाने नियुक्त पर्यवेक्षकाला चिरीमिरी देऊन बाहेर पाठवले आणि वर्गाचा ताबा घेतल्याचा आरोप आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना लाँग बुक वाटून कॉपी करण्यास प्रवृत्त केल्याची माहिती पुढे आली. विशेष म्हणजे, हा प्रकार विद्यार्थ्यानेच घरी सांगितल्यानंतर उघडकीस आला.
या घटनेनंतर विभागीय अधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून दोषी आढळल्यास कठोर कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत. बोर्डाच्या नियमांनुसार कॉपी प्रकरणात दोषी ठरलेल्या शिक्षकांवर निलंबन, फौजदारी गुन्हा आणि भविष्यातील परीक्षा कामकाजातून कायमस्वरूपी बंदी अशी कारवाई होऊ शकते.
शैक्षणिक यशासाठी शॉर्टकट वापरण्याची मानसिकता केवळ विद्यार्थ्यांनाच नव्हे तर संपूर्ण व्यवस्थेलाच कलंक लावणारी आहे. निकालाच्या टक्केवारीपेक्षा प्रामाणिकपणा आणि गुणवत्ता अधिक महत्त्वाची आहे, हा संदेश या घटनेतून अधोरेखित झाला आहे.







