पिंपरी-चिंचवड : शहरातील निगडी परिसरात दर्शनासाठी मंदिरात गेलेल्या अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मेट्रोच्या पिलर उभारणीच्या कामावर कार्यरत असलेल्या एका कामगारावर हा प्रकार केल्याचा आरोप आहे. मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाल्यानंतर प्रकरण उघडकीस आले. याप्रकरणी निगडी पोलिसांनी संबंधित कामगाराला ताब्यात घेतले असून, पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित अल्पवयीन मुलगी निगडीतील एका मंदिरात दर्शनासाठी गेली होती. त्यावेळी गाभाऱ्यात ती एकटीच होती. दर्शन घेतल्यानंतर ती काही वेळ गाभाऱ्याच्या कोपऱ्यात थांबली होती. त्याचदरम्यान मेट्रोच्या कामावर असलेला एक कामगार तेथे आला. मुलगी एकटी असल्याचे पाहून त्याने तिच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असल्याची माहिती आहे.

संबंधित कामगाराने मुलीला कोपऱ्यात ओढण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. मात्र, मुलीने प्रतिकार करत स्वतःची सुटका करून घेतली. तिने आरडाओरडा केल्यानंतर कामगार तेथून निघून जाण्याचा प्रयत्न करू लागला. या प्रकारानंतर मुलगी मंदिरातच रडू लागली. मंदिरातील सीसीटीव्ही फुटेजमुळे संपूर्ण प्रकार समोर आल्याचे सांगण्यात येत आहे.

घटनेची माहिती परिसरात पसरल्यानंतर नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन निगडी पोलिसांनी संबंधित कामगाराला ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरोधात योग्य त्या कायदेशीर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे.
या घटनेमुळे परिसरातील महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.






