पुणे: महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांतील वाद आता अधिक तीव्र होताना दिसत आहे. अजित पवार गटाचे प्रवक्ते सुरज चव्हाण (Suraj Chavhan) यांनी मंगळवारी मुंबईत माध्यमांशी बोलताना आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यावर गंभीर आरोप करत जोरदार हल्लाबोल केला. (Latest Marathi News)

चव्हाण यांनी आरोप केला की, गेल्या काही दिवसांपासून रोहित पवार यांच्या टीमकडून जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेसची बदनामी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. “आमच्या पक्षात कोणी चुकत असेल, तर त्याला शिक्षा देण्याचा अधिकार सुनेत्रा पवार यांना आहे. मात्र, पक्षात फूट पाडण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही. यापुढे बदनामीचा प्रयत्न झाला, तर जशास तसे उत्तर दिले जाईल,” असा इशारा त्यांनी दिला.
चव्हाण यांनी आणखी एक गंभीर आरोप करत सांगितले की, रोहित पवार यांनी पक्षाची प्रतिमा मलिन करण्यासाठी एका एजन्सीला तब्बल 5 कोटी रुपयांचे पॅकेज दिल्याची माहिती त्यांना मिळाली आहे. तसेच काही पदाधिकाऱ्यांना खोटे आरोप करण्यासाठी पुढे करण्यात आले असून, ते सातत्याने पक्षात संभ्रम निर्माण करत असल्याचा दावा त्यांनी केला.
याशिवाय, पक्षाच्या रचनेबाबत चुकीची माहिती पसरवली जात असल्याचाही आरोप चव्हाण यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या संविधानात सुरुवातीपासूनच मर्यादित फ्रंटल संघटना असून, ओबीसी, सामाजिक न्याय किंवा इतर सेल हे स्वतंत्र घटक आहेत, फ्रंटलचा भाग नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले. काही प्रवक्त्यांनी चुकीच्या पद्धतीने ही माहिती मांडत राज्याची दिशाभूल केल्याचेही त्यांनी नमूद केले.
या सर्व घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष अधिकच तीव्र झाल्याचे दिसत आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या या राजकारणाचा परिणाम आगामी निवडणुकांवर आणि पक्षाच्या संघटनात्मक एकतेवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.







