पुणे: राज्यभर सध्या दहावीच्या बोर्डाच्या (Pune SSC Paper Leak) परीक्षा सुरू असून या परीक्षा कॉपीमुक्त आणि पारदर्शक पद्धतीने पार पडाव्यात यासाठी शिक्षण मंडळाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र परीक्षा काळात पेपर फुटल्याच्या अफवा आणि त्यातून होणारी फसवणूक ही गंभीर समस्या पुन्हा समोर आली आहे. पुण्यात अशाच प्रकारे दहावीचा गणिताचा पेपर फुटल्याचा बनाव करून विद्यार्थ्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. (Latest Marathi News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चैतन्य शेंडे (रा. चंद्रपूर) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. विशेष म्हणजे तो स्वतः नर्सिंगच्या पहिल्या वर्षाचा विद्यार्थी असल्याचे तपासात समोर आले आहे. परीक्षेच्या काळातील विद्यार्थ्यांची घाई आणि तणाव याचा फायदा घेत त्याने ही फसवणुकीची योजना आखल्याचे समोर आले आहे.
तपासानुसार आरोपीने टेलिग्रामवर एक गट तयार केला होता. या गटामध्ये सुमारे 245 विद्यार्थी सामील झाले होते. दहावीच्या गणिताचा पेपर आपल्याकडे आधीच उपलब्ध असल्याचा दावा करत तो विद्यार्थ्यांना संपर्क करत असे. पेपर मिळवण्यासाठी प्रत्येकी 600 रुपये आकारले जात होते. अनेक विद्यार्थ्यांनी पेपर मिळेल या आशेने ऑनलाईन पद्धतीने पैसे पाठवले.
मात्र पैसे मिळाल्यानंतर आरोपी विद्यार्थ्यांना पेपर देण्याऐवजी त्यांना गटातून आणि वैयक्तिक चॅटमधून तात्काळ ब्लॉक करत असल्याचे तपासात उघड झाले. अशा प्रकारे अनेक विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. परीक्षेच्या तणावामुळे आणि चांगले गुण मिळवण्याच्या दबावामुळे काही विद्यार्थी अशा जाळ्यात अडकत असल्याचेही या प्रकरणातून स्पष्ट झाले आहे.
पुणे पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, दहावीचा कोणताही पेपर फुटलेला नाही. हा प्रकार केवळ पेपर फुटल्याची खोटी माहिती देऊन पैसे उकळण्याचा होता. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्यासोबत या प्रकारात आणखी कोणी सहभागी होते का आणि इतर विषयांच्या नावाखालीही अशी फसवणूक झाली आहे का, याचा तपास सध्या सुरू आहे.







