पुणे: पुणे शहरातील राजकीय वातावरण सध्या अस्थिर असल्याचे दिसून येत आहे. महाविकास आघाडीच्या महत्त्वाच्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाच्या नेत्यांनी अनुपस्थिती दर्शवल्याने राजकीय वर्तुळात नानाविध अडाखे बांधले जात आहेत. आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आघाडीची दिशा नेमकी काय असणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. (Pune Politics)

गेल्या काही दिवसांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवण्याच्या चर्चांना जोर आला होता. यासंदर्भात दोन्ही गटांमध्ये जागावाटपावर बैठकाही झाल्या. मात्र अजित पवार गटाने मांडलेला प्रस्ताव मान्य न झाल्याने शरद पवार गटाने या चर्चांपासून दूर राहण्याची भूमिका घेतल्याचे समोर आले. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे नेते अंकुश काकडे यांनी जागावाटपावर मतभेद असल्याने आघाडीबाबत चर्चा पुढे सरकू शकत नसल्याचे स्पष्ट केले होते.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), शिवसेना (ठाकरे गट) आणि काँग्रेस यांची पुण्यातील एका हॉटेलमध्ये बंद दरवाजामागे निवडणुकीबाबत बैठक झाल्याची माहिती समोर आली होती. या बैठकीला शरद पवार गटाचे सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. त्यामुळे महाविकास आघाडी एकजुटीने या निवडणुकीला सामोरे जाईल अशी चर्चा होती. मात्र त्यानंतर आज झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीला शरद पवार गटाच्या नेत्यांनी गैरहजेरी लावली. यामुळे महाविकास आघाडीच्या एकत्रित लढण्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
या घडामोडींमुळे शरद पवार यांची पुढील रणनीती काय असणार, तसेच पिंपरी-चिंचवड प्रमाणे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येणार का, याबाबत संभ्रमावस्था आहे. आघाडीतील समन्वयावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतानाच, पुण्यातील राजकारणात आणखी नाट्यमय घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






