पुणे: माणुसकीच्या नात्याने तहानलेल्याला (Pune News) पाणी देणे, ही आपली संस्कृती आहे. मात्र, याच माणुसकीचा गैरफायदा घेत एका डिलिव्हरी बॉयने पुण्यातील शिवाजीनगर परिसरात एका तरुण महिलेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ‘तू खूप सुंदर दिसतेस’ असे म्हणत गैरवर्तन करणाऱ्या नराधमावर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

6 मार्चच्या सायंकाळी शिवाजीनगरमधील एका उच्चभ्रू वस्तीत ही घटना घडली. पीडित तरुणीने ऑनलाइन अॅपवरून काही घरगुती साहित्य मागवले होते. संध्याकाळी 5 च्या सुमारास पार्सल घेऊन आलेल्या डिलिव्हरी बॉयने, काम झाल्यावर तहान लागल्याचे सांगून पाणी मागितले. पाणी घेतानाच तरुणाने तरुणीच्या हाताला स्पर्श करून अश्लील टिप्पणी केली. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे तरुणी हादरून गेली.
पीडितेने तातडीने पतीला ही बाब सांगितली आणि दोघांनी शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी अॅपवरील माहितीच्या आधारे आरोपीची ओळख पटवली असून श्रीधर कांबळे असे या आरोपीचे नाव असून, त्याच्यावर विनयभंगाचा (कलम 354) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






