पुणे: पैशांच्या हव्यासामुळे माणुसकी किती (Pune News) खालच्या पातळीला जाऊ शकते, याचा प्रत्यय बीडच्या आष्टी तालुक्यात आला आहे. एका 21 वर्षीय विवाहित तरुणीला लग्नाच्या बहाण्याने अवघ्या एका महिन्यात तब्बल तीन वेळा वेगवेगळ्या व्यक्तींना विकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वारंवार होणारा हा ‘व्यवहार’ आणि अमानुष छळाला कंटाळून या तरुणीने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.

लातूर जिल्ह्यातील ही तरुणी पतीसोबतच्या वादामुळे माहेरी राहत होती. याच काळात तिची ओळख पुण्यातील हडपसर येथील महानंदा नावाच्या महिलेशी झाली. “दुसरे चांगले लग्न लावून देते,” असे आमिष दाखवून महानंदाने तिला पुण्यात नेले. मात्र, तिथे गेल्यावर तरुणीला विकण्यात आले.
पहिल्यांदा अमर कालभोर नावाच्या व्यक्तीकडून 5 लाख रुपये घेऊन तिचे लग्न लावले गेले. अवघ्या 10 दिवसांत तिला तिथून काढून दुसऱ्याला 4.5 लाखांत विकले. 4 मार्च 2026 रोजी आष्टी तालुक्यातील एका व्यक्तीशी तिचे तिसरे लग्न लावून पुन्हा 4.5 लाख रुपये उकळले गेले.
6 मार्च रोजी या टोळीने पुन्हा फोन करून तिला चौथ्या लग्नासाठी तयार राहण्याची धमकी दिली. छळ सहन न झाल्याने तिने विषारी औषध प्राशन केले. सध्या तिच्यावर मिरजगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक आहे.
आष्टी पोलिसांनी महानंदा, तिचा पती आणि तुळजापूर येथील मध्यस्थांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 318 आणि 61 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.







