Pune News: पुणे : १९७४ साली घडलेल्या एका किरकोळ चोरीच्या प्रकरणात तब्बल ५१ वर्षांनंतर आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. अवघ्या ६० रुपयांचे घड्याळ, ४ रुपये रोख रक्कम आणि एक रुमाल चोरी केल्याचा आरोप असलेल्या राजाराम तुकाराम काळे यांना रेल्वे न्यायालयाने पुराव्याअभावी दोषमुक्त केले. २६ डिसेंबर रोजी दिलेल्या या निर्णयामुळे राजाराम यांना मोठा दिलासा मिळाला आहे. Pune News

ही घटना १४ मार्च १९७४ रोजी पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. राजाराम काळे आणि त्याच्या दोन साथीदारांवर एका व्यक्तीला अडवून लूट केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी दुसऱ्या दिवशी भादंवि कलम ३९४ आणि ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस तपासानंतर प्रकरण न्यायालयात दाखल झाले.
या प्रकरणातील दोन आरोपींनी गुन्हा मान्य केला होता. त्यानंतर एप्रिल १९७५ मध्ये न्यायालयाने त्यांना तीन महिन्यांची शिक्षा सुनावली होती. मात्र तिसरा आरोपी असलेल्या राजाराम काळे यांनी सुरुवातीपासूनच आरोप नाकारले. ३ एप्रिल १९७५ रोजी आरोप निश्चित झाल्यानंतर ते फरार झाले होते. त्यामुळे प्रकरणाची सुनावणी पूर्ण होऊ शकली नाही आणि ही केस अनेक वर्षे प्रलंबित राहिली.
अखेर २६ डिसेंबर रोजी रेल्वे न्यायालयाचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एन. जे. चव्हाण यांनी या प्रकरणाचा निकाल दिला. न्यायालयाने नमूद केले की, इतकी वर्षे उलटून गेल्यानंतरही फिर्यादी पक्ष एकाही साक्षीदाराला न्यायालयात हजर करू शकला नाही. आरोपीविरुद्ध कोणताही ठोस पुरावा रेकॉर्डवर उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत प्रकरण अनिश्चित काळासाठी प्रलंबित ठेवण्यात अर्थ नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
पुराव्याअभावी राजाराम काळे यांची सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता करण्यात आली. ५१ वर्षांनंतर हे जुने आणि निष्फळ ठरलेले प्रकरण अखेर बंद झाले असून, आता वृद्ध झालेल्या राजाराम यांना न्यायालयाच्या या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.







