पुणे: पुणे (Pune News) शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या शिवाजीनगर येथील एका जुन्या मंदिरात चोरीची घटना घडली आहे. चोरट्यांनी मांढरदेवी काळूबाई मंदिराचे कुलूप तोडून देवीचा मौल्यवान चांदीचा मुकुट चोरून नेला. मध्यरात्रीच्या सुमारास हा सर्व प्रकार घडला असून शनिवारी सकाळी जेव्हा भाविक मंदिरात आले तेव्हा ही चोरी लक्षात आली.

सुमारे 30000 रुपये किमतीचा हा चांदीचा मुकुट होता. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये आणि भाविकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. शिवाजीनगर पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदवला असून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासायला सुरुवात केली आहे.
पुण्यातील गर्दीच्या आणि मुख्य समजल्या जाणाऱ्या शिवाजीनगर भागात ही घटना घडल्याने मंदिरांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त वाढवावी आणि चोरट्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी आग्रही मागणी आता नागरिकांकडून केली जात आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा वेगाने तपास करत असून, सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपींपर्यंत पोहोचण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.







