पुणे: पुण्यातील (Pune News) बाणेर भागात राहणाऱ्या खेडकर कुटुंबाच्या बंगल्यात एका नोकराने धाडसी चोरी केल्याची घटना घडली आहे. अवघ्या 8 दिवसांपूर्वी कामाला आलेल्या एका नेपाळी नोकराने हा प्रकार केल्याचे समोर आले आहे. बडतर्फ आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिने स्वतः फोन करून या चोरीची माहिती चतुःश्रृंगी पोलिसांना दिली.

या घटनेत संबंधित नोकराने दिलीप आणि मनोरमा खेडकर यांना गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध केले. त्यानंतर पूजा खेडकरला बांधून ठेवून तो घरातील सर्वांचे मोबाईल घेऊन पसार झाला. पूजाने स्वतःची सुटका करून घेतल्यानंतर पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बेशुद्ध असलेल्या खेडकर दांपत्याला खासगी रुग्णालयात दाखल केले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.
पूजा खेडकरने अद्याप लेखी तक्रार दिलेली नसून मनस्थिती ठीक झाल्यावर तपशील देणार असल्याचे सांगितले आहे. मोबाईलशिवाय इतर काय चोरीला गेले आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. सध्या युपीएससी प्रकरणातील वादामुळे चर्चेत असलेल्या खेडकर यांच्या घरात हा प्रकार घडला आहे. पोलीस आता फरार नोकराचा शोध घेत आहेत.






