पुणे: पुणे (Pune News) महापालिका निवडणुकीच्या धामधुमीत प्रभाग क्रमांक 22 मध्ये भाजपच्या दोन गटांमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला आहे. प्रचाराचे काम संपल्यानंतर कार्यकर्त्यांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या सभेत बोलताना एका महिला उमेदवाराच्या भावाने दुसऱ्या महिला नगरसेविकेच्या कामावर आणि जुन्या वागणुकीवर टिका केली. मागील निवडणुकीसारखी गद्दारी यावेळी करू नका, अशी खोचक वक्तव्य केल्याअंतर तिथे उपस्थित असलेले दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते एकमेकांशी भिडले आणि जोरदार राडा झाला.

पक्षाच्या अंतर्गत बैठकीतील हा वाद एवढ्या टोकाला गेला की, कार्यकर्त्यांनी थेट खडक पोलीस स्टेशन गाठले. पोलीस कारवाई झाल्यास पक्षाची प्रतिमा मलिन होईल हे लक्षात घेऊन नेत्यांनी तातडीने मध्यस्थी केली. वरिष्ठ नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे कायदेशीर तक्रार न देता हा वाद पोलीस ठाण्याच्या बाहेरच मिटवण्यात आला. सध्या हा सर्व प्रकार शांत झाला असला तरी दोन्ही गटांमधील हा संघर्ष आता भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या दरबारी पोहोचला आहे.
रविवारी रात्री झालेला राडा केवळ पोलीस स्टेशनपर्यंतच मर्यादित राहिला नाही, तर त्याचे परिणाम आता प्रत्यक्ष प्रचारातही दिसू लागले आहेत. या पॅनेलमध्ये असलेल्या इतर उमेदवारांनी संबंधित महिला उमेदवाराचा प्रचार न करण्याचा टोकाचा पवित्रा घेतला आहे.
या अंतर्गत वादाचा फटका निवडणुकीच्या निकालावर बसू नये यासाठी पक्षाकडून आता प्रयत्न सुरू झाले आहेत. प्रभाग 22 मधील हा वाद म्हणजे जुन्या आणि नवीन कार्यकर्त्यांमधील वर्चस्वाची लढाई असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, निवडणुकीच्या ऐन तोंडावर भाजपमधील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे.







