पुणे: पुणे (Pune News) शहराजवळील बावधन परिसरात सार्वजनिक रस्त्यावर अश्लील वर्तन करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली आहे. शनिवारी बावधनमधील दोन वेगवेगळ्या भागांत पोलिसांनी छापे टाकले. सार्वजनिक सभ्यतेचा भंग होईल असे कृत्य केल्याप्रकरणी या कारवाईत एकूण 4 महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरवस्तीत आणि वर्दळीच्या ठिकाणी अशा प्रकारे अश्लील चाळे सुरू असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत होता, ज्याची दखल घेत पोलिसांनी ही कारवाई केली.

ॲम्ब्रोसिया रिसॉर्टसमोरील सार्वजनिक रस्त्यावर काही महिलांच्या अश्लील वर्तनामुळे येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागत होता. त्यानंतर पेबल्स सोसायटी 02 समोरील रस्त्यावर पोलिसांनी सापळा रचून सार्वजनिक शांतता आणि सभ्यतेचा भंग करणाऱ्यांना ताब्यात घेतले. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित महिलांवर कायदेशीर गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.
बावधनमधील आयटी पार्क आणि निवासी सोसायट्यांच्या जवळ अशा घटना वाढल्याच्या तक्रारी स्थानिक रहिवाशांनी केल्या होत्या. सार्वजनिक ठिकाणी चालणारे हे अश्लील चाळे रोखण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी वारंवार केली जात होती. पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईमुळे नागरिकांनी कौतुक केले आहे.







