पुणे: पुणे (Pune News) शहर सध्या दोन अल्पवयीन मुलींसोबत घडलेल्या अत्यंत संतापजनक प्रकारामुळे हादरले आहे. वेगवेगळ्या भागात घडलेल्या या दोन्ही घटनांमध्ये मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आले. या अत्याचारांमुळे दोन्ही मुलींना कमी वयातच आई बनण्याची वेळ आली असून नुकतीच ससून रुग्णालयात एकीची प्रसूती झाली. प्रसूतीनंतरच ही घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी वेगाने हालचाली करत दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले असून आरोपींच्या अटकेसाठी पुढील कारवाई सुरु केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका 17 वर्षांच्या तरुणीची मैत्री इंस्टाग्राम किंवा फेसबुकसारख्या माध्यमातून खान नावाच्या तरुणाशी झाली. त्याने तिला लग्नाचे स्वप्न दाखवून वारंवार तिचे शारीरिक शोषण केले. मुलगी गर्भवती राहिल्यावर आरोपीने तिच्याकडे दुर्लक्ष केले, मात्र प्रसूतीनंतर या मुलीने स्वतः हिंमत दाखवून पोलीस तक्रार नोंदवली. विमानतळ पोलीस सध्या या आरोपीचा शोध घेत आहेत.
दुसरीकडे खडक पोलीस ठाण्याच्या परिसरात एका 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलाने 16 वर्षांच्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अत्याचार केले. पीडित मुलीची प्रकृती बिघडल्यानंतर तिला ससून रुग्णालयात नेण्यात आले, जिथे तिची प्रसूती झाली. या घटनेची माहिती मिळताच पीडित मुलीच्या आईने मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.







