Pune News : पुणे: पुणे शहराच्या राजकारणात सध्या मोठी खळबळ उडाली असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे (Vasant More) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यात न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याने त्यांना अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वसंत मोरे यांनी काही दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष अविनाश विश्वनाथ लहाडे यांच्या वडिलांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप आहे. या वक्तव्यामुळे समाजातील काही घटकांच्या भावना दुखावल्याची तक्रार करण्यात आली होती. यानंतर लहाडे कुटुंबियांच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणात अटकेपासून दिलासा मिळावा म्हणून वसंत मोरे यांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र, न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आणि प्रकरणाचे स्वरूप लक्षात घेऊन हा अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे पोलिसांना पुढील कारवाई करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
दरम्यान, संबंधित वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकारामुळे फिर्यादींची बदनामी झाली असून कुटुंबीयांवर मानसिक ताण निर्माण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणामुळे पुण्यातील राजकीय वातावरण तापले असून पुढील घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून आवश्यक ती कारवाई केली जाईल, असे सांगण्यात आले आहे.







