पुणे: पुणे (Pune News) महानगरपालिका निवडणुकीच्या धामधुमीत सध्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या . प्रभाग ९ चे उमेदवार अमोल बालवडकर यांच्या समर्थनार्थ आयोजित सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपच्या स्थानिक नेत्यांवर कडाडून टीका केली. पुण्याच्या विकासात इथले स्थानिक कारभारी अडथळा ठरत असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. गेल्या ३५ वर्षांच्या राजकारणात अनेक निवडणुका पाहिल्याचे सांगत त्यांनी पुण्याच्या वाहतूक कोंडीला आणि रस्त्यांवरील खड्ड्यांना भाजपची स्थानिक ‘त्रिमुर्ती’ जबाबदार असल्याचे म्हटले.

अजित पवार भाषणादरम्यान म्हणाले की, पुणे शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी मला एकदा संधी द्या. केंद्र आणि राज्य सरकारने शहरासाठी मोठा निधी दिला, पण इथल्या नेत्यांना तो नीट वापरता आला नाही. चंद्रकांत पाटील यांचा थेट उल्लेख टाळत त्यांनी टोला लगावला की, पुणेकरांनी आपली माणसे ओळखायला हवीत, कारण बाहेरून आलेले लोक पुन्हा निघून जातील. पालकमंत्री म्हणून आपण आपली जबाबदारी चोख पार पाडत असून आपण शब्दाचे पक्के असल्याचेही त्यांनी ठामपणे सांगितले.
अमोल बालवडकर यांनी पक्ष वाढवण्यासाठी खूप मेहनत घेतली, मात्र तरीही त्यांना डावलण्यात आले हा त्यांचा अपमान असल्याचे पवार म्हणाले. ज्यांच्या डोक्यात सत्ता गेली आहे, त्यांना जागा दाखवून देण्याची वेळ आली असून येत्या १५ तारखेला या अपमानाचा बदला मतदानातून घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
अजित पवार यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे भाजपच्या स्थानिक गोटात मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. पवारांनी थेट ‘बाहेरचे लोक’ असा उल्लेख केल्याने निवडणुकीच्या रिंगणात नवा वाद रंगण्याची शक्यता आहे. दरम्यान, पुणेकर नेमका कोणाला कौल देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







