पुणे: पुणे (Pune News) महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात आता पोस्टर युद्ध सुरू झाले असून उपमुख्यमंत्री अजित पवार विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत. प्रभाग ९ मध्ये लागलेल्या बॅनरवर “हाच का दादाचा वादा?” असा सवाल विचारण्यात आला असून याची संपूर्ण पुणे शहरात चर्चा रंगली आहे. या बॅनरच्या माध्यमातून मतदारांनी अजित पवार यांना काही थेट आणि टोकदार प्रश्न विचारले आहेत.

या बॅनरवर प्रामुख्याने प्रभाग ९ मधील अवैध धंदे करणारे, जमिनी लाटणारे आणि पैसे वाटप करणाऱ्यांचा तुम्ही प्रचार करणार का, असे प्रश्न विचारून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे आज संध्याकाळी याच परिसरात अजित पवार यांची जाहीर सभा होणार आहे. त्यापूर्वीच अशा प्रकारचे बॅनर लागल्याने खळबळ उडाली आहे. स्वतःला नाराज मतदार म्हणवून घेणाऱ्यांनी हे फलक लावले असून दादांकडून ही अपेक्षा नव्हती असेही त्यावर लिहिले आहे.
राज्यात महायुती असली तरी पुण्यात मात्र भाजप आणि अजित पवार यांच्यातील संघर्ष तीव्र झाला आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना तिकीट दिल्याच्या मुद्द्यावरून भाजपने राष्ट्रवादीला घेरले होते, तर त्याला अजित पवारांनी भ्रष्टाचाराच्या आरोपांनी प्रत्युत्तर दिले होते. आता या बॅनरबाजीमुळे हा वाद अधिकच वाढला आहे. आजच्या सभेत अजित पवार या आरोपांना काय उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







