पुणे: पुणे (Pune News) महानगरपालिका निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणी भाजप आणि शिवसेना यांच्यातील जागावाटपाचा तिढा सुटण्याऐवजी अधिकच गुंतागुंतीचा झाला आहे. महायुतीमध्ये सर्व काही सुरळीत असल्याचे भासले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र जागावाटपावरून मोठी ओढाताण पाहायला मिळाली.

शिवसेनेने सुरुवातीला 35 ते 40 जागांची मागणी केली होती, परंतु भाजप केवळ 15 जागा देण्यावर ठाम होता. या विषयावर अनेक दिवस चर्चा झाली, मात्र तोडगा न निघाल्याने अखेर शिवसेनेने 135 ते 140 उमेदवारांना स्वतंत्रपणे एबी फॉर्म वाटले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उदय सामंत यांना वाद मिटवण्यासाठी पाठवले होते, मात्र तरीही दोन्ही पक्षांमधील तणाव कमी झालेला नाही.
या वादाचे मुख्य कारण 28 डिसेंबर रोजी शिवसेनेने भाजपला दिलेली 15 उमेदवारांची यादी असल्याचे समोर आले आहे. शिवसेनेने स्वतःहून जागांची मागणी कमी करून 15 उमेदवारांची नावे निश्चित केली होती, तरीही भाजपने या नावांना संमती न दिल्याने वाद विकोपाला गेला. उदय सामंत यांनी महायुती अद्याप तुटलेली नाही असे म्हटले असले तरी, शिवसेनेने मोठ्या संख्येने वाटलेले फॉर्म पाहता पुण्याच्या राजकारणात आता महायुतीमध्ये मोठा पेच निर्माण झाल्याचे स्पष्ट दिसत आहे.







