Pune News: पुणे : पुणे शहरातील कर्वेनगर भागात झालेल्या स्मिता पत्की आणि सुलभा पाच्छापूरकर या दोन महिलांच्या दुहेरी हत्येप्रकरणाला तब्बल 15 वर्षांनंतर मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या आरोपींची पुराव्याअभावी मुंबई उच्च न्यायालयाने (High Court) निर्दोष मुक्तता केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती भारती चांडक आणि भारती डोंगरे यांनी हा निकाल दिला. Pune Crime News

घरात घुसून हत्या
कर्वेनगर येथील राहत्या घरात घुसून स्मिता पत्की आणि सुलभा पाच्छापूरकर यांची हत्या करण्यात आली होती. हत्येनंतर घरातील सोन्याचे दागिनेही लुटण्यात आले होते. या घटनेनंतर पोलिसांनी अंबादास श्रीपाद जाधव, बंटी उर्फ गौरव गौतम वडवेराव आणि पंड्या उर्फ पांडुरंग अतुल जाधव यांना अटक केली होती. तपासानंतर खटला कनिष्ठ न्यायालयात चालवण्यात आला. 13 साक्षीदारांच्या जबाबावरून कनिष्ठ न्यायालयाने आरोपींना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
या निर्णयाविरोधात आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल केले. सुनावणीदरम्यान बचाव पक्षाच्या वकिलांनी तपासात झालेल्या अनेक त्रुटी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या. घटनेनंतर तब्बल 5 ते 6 महिन्यांनी आरोपींची ओळख परेड घेण्यात आली होती. ही दिरंगाई कायदेशीरदृष्ट्या संशयास्पद असल्याचे सांगण्यात आले. तसेच, जप्त केलेल्या दागिन्यांची योग्य ओळख परेडही झालेली नव्हती.
प्रकरणातील महत्त्वाचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार बसप्पा धोत्रे यांनी आरोपींना ओळखल्याचा दावा केला होता. मात्र, बचाव पक्षाने सादर केलेल्या पुराव्यांनुसार धोत्रे यांच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया झाली होती आणि त्यांची दृष्टी कमकुवत होती. अशा स्थितीत 6 महिन्यांनंतर आरोपींची ओळख करणे शक्य नसल्याचे न्यायालयाने मान्य केले.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर उच्च न्यायालयाने आरोपींविरुद्ध पुरेशी व ठोस पुरावे नसल्याचे निरीक्षण नोंदवले. पुराव्यांची साखळी पूर्ण होत नसल्याने आरोपींना निर्दोष मुक्त करण्याचे आदेश देण्यात आले. सरकारी पक्षातर्फे ॲड. एस. आर. नगरकर यांनी काम पाहिले. या निकालामुळे 15 वर्षांपासून तुरुंगात असलेल्या आरोपींची सुटका झाली आहे.







