पुणे: पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील (Pune News) सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आगामी १५ जानेवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीमुळे विस्कळीत होण्याची शक्यता आहे. निवडणूक कामासाठी बस वळवण्यात आल्याने रस्त्यावर प्रवाशांच्या सेवेसाठी केवळ ६०० बस शिल्लक राहतील. वास्तविक, शहरात दररोज १७५० बस धावत असतात, परंतु कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रांवर पोहोचवण्यासाठी आणि ईव्हीएम मशीनच्या वाहतुकीसाठी ११५० बस वापरल्या जाणार आहेत. मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यासाठी निवडणूक प्रशासनाला मोठ्या संख्येने वाहनांची गरज भासणार आहे. यासाठी पीएमपी प्रशासनाने आपल्या ताफ्यातील ११५० बस या कामासाठी राखून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, याचा थेट परिणाम शहरातील बस सेवेवर होणार असून, एकूण बसच्या संख्येत निम्म्याहून अधिक घट पाहायला मिळेल. यामुळे दोन दिवस प्रवाशांचे हाल होण्याची चिन्हे आहेत. १४ जानेवारी रोजी मतदानाच्या आदल्या दिवशी या बस साहित्यासह रवाना होतील, तर १५ जानेवारी रोजी मतदानाच्या दिवशीही या बस निवडणूक ड्युटीवर असतील. या दोन दिवसांत नोकरी आणि व्यवसायासाठी घराबाहेर पडणाऱ्या पुणेकरांना प्रवासासाठी बराच वेळ प्रतीक्षा करावी लागू शकते.
पीएमपीएमएल प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, निवडणूक हे राष्ट्रीय कर्तव्य असल्याने नियमाप्रमाणे बस उपलब्ध करून दिल्या जात आहेत. प्रवाशांचा त्रास कमी व्हावा यासाठी शक्य तितके प्रयत्न केले जात असल्याचे व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे यांनी सांगितले.







