पुणे: पुण्यातील (Pune News) एका उच्चशिक्षित पती-पत्नीने लग्नानंतर अवघ्या आठ दिवसांत कायदेशीररीत्या वेगळे होण्याचा निर्णय घेतला असून, न्यायालयानेही त्यांच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब केले आहे. हे दोघेही सुशिक्षित असून पती मरीन इंजिनिअर (जहाजावर कामाला) आहे, तर पत्नी डॉक्टर आहे. विशेष म्हणजे, या दोघांचा प्रेमविवाह झाला होता, तरीही संसाराची सुरुवात होताच त्यांच्यात टोकाचे मतभेद झाले. लग्नाच्या दुसऱ्याच दिवसापासून वादाला सुरुवात झाल्याने हे जोडपे अवघे दोन दिवस एकत्र राहिले आणि त्यानंतर गेल्या दीड वर्षापासून (18 महिने) एकमेकांपासून लांब राहत होते.

दोघांमधील वादाचे मुख्य कारण पतीच्या परदेशातील नोकरी हे होते. नातेवाईक आणि पालकांनी त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला, मात्र पुन्हा एकत्र नांदणे शक्य नसल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांनी परस्पर संमतीने घटस्फोटाचा मार्ग निवडला. अॅड. राणी कांबळे-सोनावणे यांच्या माध्यमातून त्यांनी कौटुंबिक न्यायालयात धाव घेतली. पतीला नोकरीसाठी तातडीने जहाजावर रुजू व्हायचे असल्याने, या प्रकरणाची सुनावणी लवकर घेण्याची विनंती करण्यात आली होती.
सर्वसाधारणपणे घटस्फोटासाठी सहा महिन्यांचा ‘वेटिंग पिरियड’ असतो, पण हे जोडपे आधीच दीड वर्षांहून अधिक काळ वेगळे राहत असल्याने न्यायालयाने हा कालावधी कमी केला. अशा प्रकारे केवळ आठ दिवसांत या प्रेमविवाहाचा कायदेशीर अंत झाला. पुण्यात या घटनेची चर्चा असून, सुशिक्षित तरुणांमधील बदलती मानसिकता आणि तुटत चाललेल्या नात्यांबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे.







