पुणे: पुण्यातील (Pune News) हडपसर भागातील शेवाळवाडी येथे एका २२ वर्षांच्या विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पूनम युवराज लष्करे असे या मृत तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी फुरसुंगी पोलिसांनी कारवाई करत पूनमचे सासरे संतोष लष्करे, सासू तारा लष्करे आणि आजेसासू बायडाबाई यांना अटक केली असून पती युवराज लष्करे याच्यावरही गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पूनमचा विवाह काही काळापूर्वी युवराज या रिक्षाचालकाशी झाला होता. मात्र, लग्नानंतर काही दिवस उलटले तरी मूल होत नसल्याने सासरच्या मंडळींनी तिला मानसिक आणि शारीरिक त्रास द्यायला सुरुवात केली होती. सासरचे लोक तिला सतत टोचून बोलत असत. या छळासोबतच, पतीला नवीन रिक्षा विकत घेण्यासाठी माहेरून पैसे घेऊन ये, अशी मागणीही करत होता. पैशांसाठी तिचा वारंवार छळ केला जात होता.
सासरच्या या सततच्या त्रासामुळे पूनम प्रचंड दबावाखाली होती. अखेर, तिने हतबल होऊन राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेनंतर पूनमच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ हालचाल करत 3 जणांना बेड्या ठोकल्या आहेत. पोलीस आता या प्रकरणाचा अधिक तपास करत असून फरार असलेल्या पतीचा शोध घेत आहेत.






