पुणे: पुणे (Pune News) महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक 23 मध्ये एक अतिशय थरारक आणि वेगळा राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे. शहरातील रविवार पेठ आणि नाना पेठ या भागात वर्चस्व असलेल्या आंदेकर आणि कोमकर या दोन कुटुंबांमधील जुने आता चक्क मतदानाच्या मैदानात उतरले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने आंदेकर कुटुंबातील दोन महिलांना, म्हणजे लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांना उमेदवारी दिली आहे. या निर्णयामुळे संतापलेल्या कल्याणी कोमकर यांनी थेट अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून त्यांनी आपला उमेदवारी अर्जही दाखल केला आहे.

कल्याणी कोमकर या आयुष कोमकर यांच्या आई आहेत आणि त्यांनी यापूर्वीच इशारा दिला होता की, जर आंदेकर कुटुंबाला तिकीट दिले तर त्या टोकाचे पाऊल उचलतील. मात्र, पक्षाने आंदेकर कुटुंबालाच झुकते माप दिल्याने त्यांनी आता थेट निवडणुकीतून आव्हान देण्याचे ठरवले आहे. विशेष म्हणजे, माजी नगरसेवक वनराज आंदेकर आणि आयुष कोमकर यांच्या खून प्रकरणानंतर या दोन कुटुंबांमधील रक्ताचे नाते कायमचे संपले असून त्याचे रूपांतर भीषण वैमनस्यात झाले आहे.
एकाच प्रभागात आणि एकाच कुटुंबातून आलेल्या या परस्परविरोधी उमेदवारांमुळे स्थानिक मतदारांमध्ये नागरिक कोणाला पाठिंबा देणार ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे. एकेकाळी एकत्र असलेल्या या कुटुंबातील महिला आता एकमेकींविरुद्ध उभ्या ठाकल्याने, प्रभाग 23 ची ही लढत केवळ सत्तेसाठी नसून ती वर्चस्वाची लढाई बनली आहे. पुण्याच्या या हायव्होल्टेज निवडणुकीत जनता कोणाच्या बाजूने कौल देते, याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.






