पुणे: पुणे (Pune News) जिल्ह्यातील कोंढवा येवलेवाडी भागामध्ये राहणाऱ्या एका ३० वर्षांच्या तरुणाने रेल्वेखाली उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. रामदास भरत पवार असे या मृत तरुणाचे नाव असून तो एका सलूनमध्ये काम करत होता. या प्रकरणात पोलिसांनी एकूण ७ जणांवर गुन्हा दाखल केला असून त्यात २ महिलांचाही समावेश आहे. या सर्व जणांनी मिळून रामदासला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तपासादरम्यान असे समोर आले आहे की, रामदासचे त्याच्या सलूनच्या मालकिणीसोबत काही कारणावरून खटके उडाले होते. या वादाचे रूपांतर नंतर मोठ्या छळात झाले. शीतल काळे, अरविंद काळे, सतीश सरोदे, नितीन सरोदे, श्रृती कन्हेरे, ऋषी कन्हेरे आणि मोहन सोनार या सर्वांनी रामदासला गुन्हा दाखल करण्याची आणि जेलमध्ये टाकण्याची भीती घातली होती. तसेच तक्रार मागे घेण्यासाठी त्याच्याकडे ५ लाख रुपयांची मोठी मागणी करण्यात आली होती. या सततच्या धमक्यांमुळे रामदास खूप घाबरला होता आणि प्रचंड मानसिक तणावाखाली वावरत होता.
शेवटी या त्रासाला कंटाळून त्याने धावत्या रेल्वेसमोर उडी मारली. मृत्यूला कवटाळण्यापूर्वी रामदासने वहीत आणि सोशल मीडिया अकाउंटवर एक सविस्तर चिठ्ठी लिहून ठेवली होती. या चिठ्ठीत त्याने नमूद केले होते की, या ७ लोकांच्या छळामुळेच तो आपले आयुष्य संपवत आहे. त्याने या त्रासाबद्दल आपल्या बहिणीलाही पूर्वी सांगितले होते. त्याच्या बहिणीने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी या गंभीर प्रकरणाची दखल घेतली आहे.







