Pune News: पुणे : पुणे शहरातील एच. व्ही. देसाई महाविद्यालयाबाहेर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. महाविद्यालय प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यासाठी परवानगी नाकारल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली असून त्यांनी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर जमून घोषणाबाजी केली.

शनिवार वाडा परिसरातील या महाविद्यालयाबाहेर विद्यार्थ्यांनी प्रशासनाविरोधात निषेध व्यक्त केला. छत्रपती शिवाजी महाराज हे प्रेरणादायी ऐतिहासिक व्यक्तिमत्व असून त्यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम घेण्यास परवानगी का दिली जात नाही, असा सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला. महाविद्यालयाच्या आवारात कार्यक्रम घेण्याची विनंती केली होती, मात्र ती मान्य करण्यात आली नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
परवानगी नाकारल्यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सदस्यांनी महाविद्यालयाबाहेर शांततापूर्ण आंदोलन करत प्रशासनाकडून स्पष्ट भूमिका मांडण्याची मागणी केली. या प्रकरणामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.






