अमित मुंडीक

पुणे: पुणे (Pune News) शहर गुन्हे शाखेच्या युनिट 3 ने एका सराईत तडीपार गुन्हेगारावर मोठी कारवाई केली आहे. रेकॉर्डवरील आरोपीला बेकायदेशीर पिस्टल आणि जिवंत काडतुसांसह अटक करण्यात आली आहे. 29 डिसेंबर रोजी गुन्हे शाखेचे पथक सिंहगड रोड, नांदेड सिटी, वारजे आणि उत्तमनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना ही कारवाई करण्यात आली. गस्तीदरम्यान एका गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी ही यशस्वी मोहीम राबवली.
मिळालेल्या माहितीनुसार गणेश सतीश रणखांब नावाचा 35 वर्षीय इसम बेकायदेशीर शस्त्र बाळगून असल्याची खात्रीशीर बातमी पोलिसांना मिळाली होती. आरोपी हा कोथरुडमधील शास्त्रीनगर भागातील रहिवासी असून त्याच्यावर यापूर्वी तडीपारीची कारवाई करण्यात आलेली आहे. पोलिसांनी सिंहगड सृष्टी परिसरातील टी-पॉईंट चौक आणि एनडीए खडवासला मार्गावरील एका टपरीजवळ सापळा रचला. यावेळी आरोपीला अतिशय शिताफीने ताब्यात घेण्यात आले. त्याच्या झडतीत पोलिसांना 1 पिस्टल आणि 2 जिवंत काडतुसे मिळून आली असून ती जप्त करण्यात आली आहेत.
कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्याला पुढील तपासासाठी उत्तमनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. शहरात गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी तडीपार गुन्हेगारांविरुद्ध पोलिसांनी ही मोहीम तीव्र केली आहे. ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उप आयुक्त निखिल पिंगळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त विजय कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. युनिट 3 चे प्रभारी पोलीस निरीक्षक राम राजमाने आणि त्यांच्या पथकाने या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली आहे.






