Pune News: पुणे : इंदापूर तालुक्यातील एका ढाब्यावर काम करत असताना विजेचा धक्का लागून 26 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी दोन जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. मृत तरुणाच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सौरभ मच्छिंद्र कसबे (वय 26, रा. मदनवाडी-चौफुला, ता. इंदापूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. 5 मार्च रोजी भादलवाडी परिसरातील बळीराजा ढाब्यावर ही घटना घडली. त्या वेळी सौरभ ढाब्यावर काम करत होता. ढाब्याजवळील विजेच्या खांबावरून जोडलेला एक इलेक्ट्रिक हुक काढण्यास त्याला सांगण्यात आले होते.
तक्रारीनुसार, सौरभने संबंधित व्यक्तींना सांगितले होते की त्याला अशा प्रकारचे इलेक्ट्रिक काम करण्याचा अनुभव नाही. तसेच त्याने यापूर्वी कधीही असे काम केले नव्हते. मात्र तरीही त्याला फक्त विजेची वायर हलवून हुक खाली पडेल असे सांगण्यात आले. त्यानुसार सौरभने उजव्या हाताने विजेची तार पकडून ती हलवण्याचा प्रयत्न केला.
या वेळी त्याला अचानक जोरदार विजेचा धक्का बसला. या धक्क्यामुळे त्याच्या हाताच्या बोटांना, छातीला आणि पाठीला गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर त्याला तातडीने उपचारासाठी पुण्यातील कसबा पेठ येथील सूर्य सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.
या प्रकरणी मृत सौरभचा भाऊ रोहित मच्छिंद्र कसबे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीवरून भिगवण पोलिसांनी संतोष उर्फ मुकेश पवार (रा. मदनवाडी, ता. इंदापूर) आणि बळीराजा ढाब्याचे मालक सागर खाडे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.







