पुणे: पुणे आणि नाशिक या दोन महत्त्वाच्या (Pune-Nashik Highspeed Railway) शहरांना जोडणाऱ्या सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला पुन्हा एकदा मोठा अडथळा निर्माण झाला आहे. अनेक वर्षांपासून विकासाचे स्वप्न म्हणून मांडला जाणारा हा प्रकल्प आता तांत्रिक अडचणी आणि प्रशासकीय निर्णयांच्या कचाट्यात सापडला असून त्याचे भवितव्य अनिश्चित झाले आहे. (Latest Marathi News)

या प्रकल्पाचा मुख्य अडसर ठरला आहे तो नारायणगावजवळील खोडद येथील ‘जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप’ म्हणजेच जीएमआरटी. प्रस्तावित रेल्वे मार्गिका ही या वेधशाळेच्या संवेदनशील ‘बफर झोन’मधून जाणार असल्याने गंभीर आक्षेप नोंदवण्यात आले आहेत. रेल्वेचे विद्युतीकरण आणि वेगवान गाड्यांमुळे निर्माण होणाऱ्या विद्युतचुंबकीय लहरींचा परिणाम वेधशाळेतील अँटेना आणि संशोधनावर होऊ शकतो, अशी भीती ‘नॅशनल सेंटर फॉर रेडिओ अॅस्ट्रोफिजिक्स’ने व्यक्त केली आहे. यामुळे रेल्वे बोर्डाने यापूर्वी दिलेली प्राथमिक मान्यता मागे घेतली आहे.
विधान परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारकडून तज्ज्ञ समिती नेमली जाणार आहे. ही समिती रेल्वे मार्ग आणि जीएमआरटी यांच्यात तांत्रिक समन्वय शक्य आहे का, याचा सखोल अभ्यास करणार आहे. या अहवालावरच प्रकल्पाचा पुढील मार्ग ठरणार आहे.
दरम्यान, आर्थिक पातळीवरही या प्रकल्पाला मोठा धक्का बसला आहे. राज्य सरकारने ‘महारेल’ला दिलेल्या 1 हजार 62 कोटींपैकी सुमारे 684 कोटी 62 लाख रुपये परत घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. प्रकल्पातील विलंबामुळे खर्चही प्रचंड वाढून जवळपास 17 हजार 889 कोटी 28 लाखांवर पोहोचला आहे.
प्रकल्पाची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थेतही बदल करण्यात आला असून आता हा प्रकल्प ‘महारेल’ऐवजी मध्य रेल्वेमार्फत राबवला जाणार आहे. दुसरीकडे भूसंपादनाची प्रक्रिया काही प्रमाणात पूर्ण झाली असली, तरी मार्ग बदलण्याच्या शक्यतेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये अस्वस्थता आहे. अनेक गावांना रेल्वेपासून वंचित राहण्याची भीती असल्याने जुनाच मार्ग कायम ठेवण्यासाठी आंदोलन सुरू झाले आहे.
एकूणच, तांत्रिक अडथळे, वाढता खर्च आणि स्थानिक विरोध या तिन्ही कारणांमुळे पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प सध्या अडचणीत आला आहे. विकास आणि विज्ञान यांच्यात समतोल साधण्याचे मोठे आव्हान सरकारसमोर उभे ठाकले असून, पुढील निर्णय हा या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भविष्य ठरवणार आहे.







