पुणे: पुणे महापालिकेची पहिली सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली. या बैठकीत भाजपने आगामी स्थायी समितीसाठी आपल्या सदस्यांची नावे जाहीर केली. यंदा अनेक नवनिर्वाचित नगरसेवकांना स्थायी समितीत संधी देण्यात आल्याने महापालिकेतील राजकीय समीकरणांना नवी दिशा मिळण्याची चिन्हे आहेत.

आता पुढील आठवड्यात पीठासन अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची निवड होणार आहे. या पार्श्वभूमीवर अध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेले भाजप नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांनी माध्यमांशी संवाद साधताना महत्त्वाची माहिती दिली. पक्षाकडून स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीबाबतही लवकरच निर्णय होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भाजपकडून जयश्री भुमकर, रूपाली धाडवे, कालिंदा पुंडे, विशाल कानवडे, सातव रत्नमाला, प्राची आल्हाट, मयुरी कोकाटे, दादा कोद्रे, वृषाली कामठे, संदीप बेलदरे, मानवतकर निशा, श्रीनाथ भिमाले यांची स्थायी समिती सदस्य म्हणून नावे जाहीर करण्यात आले आहे.
स्थायी समिती ही महापालिकेतील आर्थिक व प्रशासकीय निर्णयप्रक्रियेसाठी महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







