Pune MHADA Lottery: पुणे: पुणे शहरात स्वतःच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांची प्रतीक्षा आता आणखी वाढली आहे. पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाने जाहीर केलेल्या सुमारे सव्वाचार हजार घरांची सोडत आचारसंहितेमुळे अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या आचारसंहितेचा थेट परिणाम या प्रक्रियेवर झाला आहे. त्यामुळे नागरिकांना अपेक्षित असलेली घरांची सोडत सध्या रखडली असून ती आता फेब्रुवारी महिन्यात होण्याची शक्यता आहे, अशी माहिती म्हाडाचे मुख्याधिकारी राहुल साकोरे यांनी दिली. MHADA lottery

हेही वाचा- पुण्यातील धक्कादायक प्रकार! ‘चल आपण खेळू’ म्हणत झाडीत नेलं अन् अल्पवयीन मुलासोबत केलं भयंकर कृत्य…
पुणे, पिंपरी-चिंचवड, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांतील एकूण 4168 घरांसाठी म्हाडाने अर्ज मागवले होते. या घरांसाठी नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून तब्बल 2 लाख 15 हजार 847 अर्ज दाखल झाले आहेत. अर्जांची संख्या मोठी असल्यामुळे त्यांची छाननी आणि पडताळणी करण्यासाठी अधिक वेळ लागला. सुरुवातीला ही सोडत 11 डिसेंबर रोजी होणार होती. मात्र पडताळणी पूर्ण न झाल्याने ती 16 आणि 17 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली.
याच दरम्यान निवडणुकांची आचारसंहिता लागू झाल्यामुळे संपूर्ण प्रक्रिया थांबवावी लागली. म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांनी विशेष परवानगी घेऊन सोडत जाहीर करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र प्रशासकीय पातळीवर आवश्यक परवानगी मिळू न शकल्याने ही योजना प्रत्यक्षात येऊ शकली नाही. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 31 जानेवारीपर्यंत जिल्हा परिषदांच्या निवडणुका घ्याव्या लागणार असल्याने आचारसंहितेचा कालावधी वाढण्याची शक्यता आहे.
या सोडतीसाठी अर्ज शुल्क आणि अनामत रक्कम स्वरूपात म्हाडाकडे एकूण 446 कोटी 97 लाख रुपये जमा झाले आहेत. सोडत लांबणीवर पडल्यामुळे या रकमेवर मिळणारे व्याज राज्य सरकारच्या तिजोरीत जाणार आहे. मात्र आमची रक्कम अडकून पडली असून त्या व्याजावर आमचाही हक्क आहे, अशी मागणी अनेक अर्जदारांकडून होत आहे. आता हजारो कुटुंबांना फेब्रुवारी महिन्याची वाट पाहावी लागणार आहे.







