पुणे : माण-हिंजवडी ते शिवाजीनगर या महत्त्वाकांक्षी मेट्रो मार्गाला प्रवासी सेवा सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. बुधवारी (४ नोव्हेंबर) या मार्गावरून तब्बल ५० हजार प्रवाशांनी प्रवास केला. विशेष म्हणजे, दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे शहरातील बहुतांश कार्यालये आणि व्यावसायिक आस्थापने बंद असतानाही नागरिकांनी मेट्रो प्रवासाला पसंती दिली.

या मार्गावरील जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानक प्रवाशांच्या सर्वाधिक पसंतीचे ठरले. या स्थानकावरून पहिल्याच दिवशी सुमारे २५ हजार प्रवाशांनी प्रवास केला. पुणे रेल्वे स्थानकासह शहरातील विविध भागांना जोडणारे महत्त्वाचे केंद्र असल्याने या स्थानकावर दिवसभर प्रवाशांची मोठी वर्दळ पाहायला मिळाली.
दिवाळीच्या सुट्ट्या संपल्यानंतर पुढील दोन आठवड्यांत कार्यालये आणि व्यावसायिक आस्थापनांचे नियमित कामकाज सुरू होईल. त्यामुळे या मार्गावरील प्रवासी संख्येत आणखी वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

संभाव्य गर्दी लक्षात घेऊन मेट्रोच्या फेऱ्यांच्या वेळापत्रकात बदल करण्याचे नियोजन आहे. त्यानुसार गर्दीच्या वेळेत दर पाच मिनिटांनी, तर गर्दी कमी असलेल्या वेळेत दर आठ मिनिटांनी मेट्रो उपलब्ध करून दिली जाणार आहे.

माण-हिंजवडी ते शिवाजीनगर हा संपूर्ण मेट्रो प्रवास सुमारे ४० मिनिटांत पूर्ण होणार आहे. त्यामुळे विशेषतः आयटी क्षेत्रातील कर्मचारी आणि दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. पहिल्याच दिवशी मिळालेल्या प्रतिसादामुळे या मेट्रो मार्गावरील प्रवासी सेवेला आगामी काळात आणखी चांगला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.






