पुणे: पुणे महापालिकेच्या निवडणूक निकालांनी (Pune Election Result) शहराच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवून आणली आहे. मतमोजणी सुरू होताच अनेक दिग्गज (Rupali Thombre Patil) नेते आणि त्यांच्या (Ravindra Dhangekar) कुटुंबीयांना पराभवाचा सामना करावा लागल्याचे (Vasant More) चित्र स्पष्ट झाले आहे. या निकालांमुळे काही राजकीय घराणी आणि टोळ्यांचा प्रभाव कमी झाल्याचेही स्पष्टपणे दिसून येत आहे. (Latest Marathi News)

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांनी प्रभाग क्रमांक 25 आणि 26 मधून निवडणूक लढवली होती. दोन्ही ठिकाणी त्यांचा पराभव झाला आहे. मतमोजणीच्या सुरुवातीला त्यांनी ईव्हीएम मशीन बदलल्याचा आरोप करत आक्षेप घेतला होता आणि काही काळ मतमोजणी थांबवलीही होती. मात्र अखेर निकाल त्यांच्या विरोधात लागल्याने हा पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले आंदेकर टोळीचे प्रमुख बंडू ऊर्फ सूर्यकांत आंदेकर यांनाही मतदारांनी नाकारले आहे. अपक्ष उमेदवार म्हणून प्रभाग क्रमांक 24 मधून लढलेल्या बंडू आंदेकरांना अवघी 153 मते मिळाली आणि त्यांचा दारुण पराभव झाला. विशेष म्हणजे त्यांच्या भावजयी लक्ष्मी आंदेकर आणि सून सोनाली आंदेकर या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार म्हणून प्रभाग क्रमांक 23 मधून निवडून आल्या आहेत. त्यामुळे आंदेकर कुटुंबातच राजकीय विरोधाभास पाहायला मिळतो.
शिवसेना नेते आणि माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनाही मोठा धक्का बसला आहे. त्यांनी पत्नी प्रतिभा आणि मुलगा प्रणव यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. मात्र प्रतिभा धंगेकर यांचा प्रभाग क्रमांक 23 मधून तर प्रणव धंगेकर यांचा प्रभाग क्रमांक 24 मधून पराभव झाला आहे.
मनसेतून शिवसेना ठाकरे गटात गेलेले वसंत मोरे यांनाही मतदारांनी नकार दिला आहे. वसंत मोरे आणि त्यांचा मुलगा दोघेही शिवसेना ठाकरे गटाकडून लढले होते, मात्र दोघांचाही मोठ्या फरकाने पराभव झाला.
या निकालांमुळे पुण्यातील राजकीय समीकरणे बदलत असून, मतदारांनी यावेळी जुनी घराणी, टोळीयुक्त राजकारण आणि वादग्रस्त चेहऱ्यांऐवजी नव्या नेतृत्वाला संधी दिल्याचे स्पष्ट होत आहे.






