Pune Cyber Crime : पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरातून सायबर फसवणुकीची एक अत्यंत मोठी आणि धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हिंजवडी येथील आयटी हबमध्ये काम करणाऱ्या एका सुशिक्षित महिला सॉफ्टवेअर इंजिनिअरला सायबर भामट्यांनी आपल्या जाळ्यात ओढून तब्बल 42,64,032 रुपयांचा गंडा घातला आहे. या घटनेमुळे आयटी क्षेत्रात आणि परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

नेमकी घटना काय ?
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने विवाह संकेतस्थळावर खोटे प्रोफाइल तयार करून स्वतःला इस्रोमध्ये शास्त्रज्ञ म्हणून काम करत असल्याचे सांगितले. त्याने पीडित महिलेशी संपर्क साधून लग्नाचे आश्वासन दिले आणि विश्वास संपादन केला. विविध कारणे सांगत त्याने नोव्हेंबर 2024 ते जानेवारी 2025 या कालावधीत अनेक हप्त्यांत एकूण 42,64,032 रुपये तिच्याकडून घेतले.
आरोपीवर गुन्हा दाखल
आर्थिक अडचण असल्याचे सांगून पगार मिळाल्यानंतर पैसे परत देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र काही दिवसांनी त्याने संपर्क तोडला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने सायबर क्राइम पोर्टलवर तक्रार केली. त्यानंतर 16,64,032 रुपये परत मिळाले, मात्र सुमारे 27 लाख रुपये अद्याप परत मिळालेले नाहीत. या प्रकरणी आदर्श प्रशांत म्हात्रे उर्फ जयेश पाटील (वय 36, रा. अलिबाग) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वाकड पोलीस करत आहेत.



