Pune Crime : पुणे, ता. 28 : स्वतःला वकील असल्याचे भासवून महिलेकडून केस लढवण्याच्या बहाण्याने वेळोवेळी 1 लाख 96 हजार रुपये उकळून आर्थिक फसवणूक आणि मानसिक त्रास दिल्याप्रकरणी एका बोगस वकील महिलेविरुद्ध कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गौरी प्रल्हाद वांजळे (वय 40, रा. धनलक्ष्मी अपार्टमेंट, कोथरूड) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित महिलेचे नाव आहे. याप्रकरणी स्वाती प्रमोद बलकवडे (वय 34, रा. भुकूम, ता. मुळशी) यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कोथरूड पोलिसांनी गौरी वांजळे तसेच आणखी दोन अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी स्वाती बलकवडे यांनी एका जुन्या प्रकरणासाठी कायदेशीर मदत घेण्यासाठी ओमकार चव्हाण नावाच्या वकिलांशी संपर्क साधला होता. चव्हाण यांनी त्यांना गौरी वांजळे यांचा मोबाईल क्रमांक दिला. वांजळे यांनी आपण वकील असल्याचे सांगून केस लढवण्यासाठी 2 लाख रुपयांची फी मागितली होती.
5 जुलै 2023 ते 17 मार्च 2026 या कालावधीत स्वाती बलकवडे यांनी वांजळे यांना रोख 55 हजार रुपये आणि ऑनलाइन पद्धतीने 1 लाख 41 हजार रुपये, असे एकूण 1 लाख 96 हजार रुपये दिले. मात्र एवढी रक्कम घेऊनही वांजळे यांनी कोणतेही कायदेशीर काम केले नाही. पैसे परत मागितल्यावर त्यांनी शिवीगाळ करून “मी कोण आहे तुला माहिती नाही, तुला खोट्या गुन्ह्यात अडकवेन” अशी धमकी दिली.
त्यानंतर वांजळे यांनी स्वाती यांना भेटायला बोलावून गाडीत बसवून वडगाव मावळच्या दिशेने नेले. गाडीत दोन अनोळखी इसम होते. त्यांनी स्वाती यांना मारहाण करून धमकी दिली आणि त्यांच्या पतीला रिक्षा चालवू देणार नाही, असे सांगितले. त्यानंतर त्यांना भुकूम येथे सोडून दिले.
या प्रकरणी यापूर्वी दोन वेळा अदखलपात्र गुन्हे नोंदवण्यात आले होते. अखेर 27 मार्च 2026 रोजी दिलेल्या तक्रारीनुसार वांजळे आणि इतर दोघांविरुद्ध फसवणूक, मारहाण आणि धमकीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून कोथरूड पोलीस पुढील तपास करत आहेत.






