पुणे: पुणे शहरातील अनैतिक मानवी वाहतुकीविरोधात (Pune Crime) गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत पुणे–सातारा रस्त्यावरील एका लॉजवर छापा टाकला. या कारवाईत एका अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आली असून तिला वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून तीन जणांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने केली. (Breaking News)

अटक करण्यात आलेल्यांमध्ये वर्षा शंकर शिरसाठी (35, रा. विजयनगर, चिंचवड), अनिल मदन जेधे (35, रा. साने चौक, चिंचवड) आणि जीवन प्रमोद इंगोले (33, सध्या रा. साई लॉज, बालाजीनगर, पुणे–सातारा रस्ता) यांचा समावेश आहे. त्यांच्याविरोधात सहकारनगर पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी वाहतूक आणि व्यापार प्रतिबंध अधिनियम तसेच पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, पुणे–सातारा रस्त्यावरील साई लॉजमध्ये एका अल्पवयीन मुलीला पैशांचे आमिष दाखवून वेश्या व्यवसायात ढकलले जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचून लॉजवर छापा टाकला. तेव्हा संबंधित मुलगी संशयितांच्या ताब्यात आढळली. प्राथमिक चौकशीत पैशांचे आमिष दाखवून तिला या व्यवसायात आणल्याचे उघड झाले.
ही घटना शहरातील लॉज आणि निवासस्थानी सुरू असलेल्या बेकायदेशीर हालचालींकडे पुन्हा लक्ष वेधते. अल्पवयीन मुलींना फसवून किंवा आमिष दाखवून या व्यवसायात ओढले जाण्याचे प्रकार गंभीर चिंतेचा विषय आहेत. पोलिसांनी नागरिकांना अशा संशयास्पद हालचाली आढळल्यास तातडीने माहिती देण्याचे आवाहन केले आहे.
सुटका करण्यात आलेल्या मुलीला समुपदेशन व आवश्यक कायदेशीर मदत दिली जाणार असून या रॅकेटमागील इतर संबंधितांचा शोध सुरू आहे. शहरातील लॉज आणि हॉटेल्सवर देखरेख वाढवण्याची गरज या कारवाईनंतर अधोरेखित झाली आहे.







