Pune crime: पिंपरी-चिंचवड : महापालिका निवडणुकीच्या (Municipal Corporation election) पार्श्वभूमीवर शहरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. निवडणुकीमुळे शहरातील विविध भागात नाकाबंदी करून संशयित वाहनांची तपासणी सुरू आहे. अशाच तपासणीदरम्यान पिंपळे सौदागर परिसरातून एका दुचाकीस्वाराकडून मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. सांगवी पोलिसांनी कुंजीर चौकात ही कारवाई करून अंदाजे 15 लाख रुपयांची रोकड ताब्यात घेतली आहे.

सध्या निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे शहरातील प्रमुख चौक, रस्ते आणि संवेदनशील भागात पोलीस पथके तैनात आहेत. पिंपळे सौदागर येथील कुंजीर चौकात सांगवी पोलीस नाकाबंदी करत असताना एक दुचाकीस्वार संशयास्पद हालचाली करत जाताना पोलिसांच्या निदर्शनास आला. पोलिसांनी त्याला थांबवून चौकशी सुरू केली. त्यानंतर त्याच्या खांद्यावरील बॅगेची झडती घेतली असता, पोलिसांना मोठी रक्कम आढळून आली.
बॅगेत भारतीय चलनातील 12 लाख रुपये आणि परदेशी चलनातील सुमारे 2 लाख रुपये मिळून एकूण अंदाजे 15 लाख रुपयांची रोकड असल्याचे समोर आले. एवढ्या मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आढळल्याने पोलिसांनी तातडीने दुचाकीस्वारास ताब्यात घेतले आणि संपूर्ण रक्कम जप्त केली. प्राथमिक चौकशीत संबंधित तरुणाने आपण परकीय चलन विनिमयाचा व्यवसाय करत असल्याचे सांगितले आहे.

मात्र, निवडणुकीच्या काळात एवढी मोठी रोख रक्कम बाळगणे संशयास्पद मानले जात असल्याने पोलिसांनी त्याच्याकडील कागदपत्रांची तपासणी सुरू केली आहे. सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली असून परकीय चलन विभाग आणि आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देण्यात आली आहे. ही रक्कम नेमकी कोठून आली आणि ती कोठे नेली जात होती, याचा सखोल तपास सुरू आहे. कागदपत्रांमध्ये काही त्रुटी आढळल्यास संबंधित व्यक्तीवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.






