Pune Crime: पुणे : पुणे जिल्ह्यातील सिंहगड पायथ्याशी असलेल्या खानापूर ता. हवेली परिसरात शुक्रवारी भरदिवसा झालेल्या दरोड्याने संपूर्ण परिसर हादरला आहे. पानशेत रस्त्यावरील वैष्णवी ज्वेलर्स या सराफा दुकानावर पाच सशस्त्र दरोडेखोरांनी हल्ला करून मोठी लूट केली. अवघ्या दोन मिनिटांत सुमारे 1 कोटी रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेमुळे खडकवासला आणि सिंहगड परिसरातील व्यापाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी दुपारी साडे12च्या सुमारास वैष्णवी ज्वेलर्स दुकानात मालक श्री. बाबर, त्यांचा आजारी मुलगा आणि दोन महिला कर्मचारी उपस्थित होते. त्याच वेळी दोन दुचाकींवरून पाच जण दुकानासमोर आले. सर्वांनी तोंडाला रुमाल बांधलेले होते. दुकानात प्रवेश करताच दरोडेखोरांनी धारदार कोयते काढून सर्वांना ठार मारण्याची धमकी दिली. अचानक घडलेल्या प्रकारामुळे दुकानातील वातावरण तणावपूर्ण झाले.
अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने आलेल्या या टोळीने काचेच्या कपाटातील अंदाजे 75 ते 80 तोळे सोन्याचे दागिने काढून पिशव्यांमध्ये भरले. ही संपूर्ण कारवाई दीड ते 2 मिनिटांत पूर्ण करण्यात आली. त्यानंतर दरोडेखोर पानशेतच्या दिशेने वेगाने पसार झाले.
सीसीटीव्ही फुटेज व्हायरल
या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओही समोर आला असून त्यामध्ये पाचही दरोडेखोर दुकानात शिरताना स्पष्टपणे दिसत आहेत. काही जण झपाट्याने दागिने गोळा करताना तर एक जण मालक आणि कर्मचाऱ्यांना हत्यार दाखवून धमकावताना दिसतो. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे.
पोलिसांकडून दरोडेखोरांनी पळून जाण्यासाठी वापरलेल्या मार्गांचा तपास सुरू आहे. प्राथमिक तपासात दरोडेखोरांनी या परिसराची आधीच रेकी केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. भरवस्तीत आणि वर्दळीच्या रस्त्यावर घडलेल्या या धाडसी दरोड्यामुळे स्थानिक नागरिक आणि व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पोलीस अधिक तपास करत आहेत.






