पुणे: ब्लड प्रेशर कमी झाल्यावर (Pune Crime) डॉक्टरांच्या सल्ल्याने वापरले जाणारे एक इंजेक्शन खेळाडूंनी चुकीच्या पद्धतीने वापरल्यास ते जीवघेणे ठरू शकते. अशा इंजेक्शनची अवैध विक्री करणाऱ्या एका तरुणावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी थेरगाव फाटा परिसरात करण्यात आली. (Latest Marathi News)

या प्रकरणी पोलीस शिपाई अमर राणे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी 24 वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा नोंदवला आहे. आरोपी हा कोणताही परवाना नसताना औषधांची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मेफेन्टरमाइन सल्फेट या इंजेक्शनची अवैध विक्री करताना मिळून आला. हे इंजेक्शन प्रामुख्याने कमी रक्तदाबाच्या रुग्णांसाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने वापरले जाते. मात्र, काही खेळाडू आणि तरुणांकडून शारीरिक ताकद आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी या औषधाचा गैरवापर केला जात असल्याचे समोर आले आहे. अशा प्रकारे या इंजेक्शनचा वापर केल्यास हृदयविकाराचा झटका येणे, गंभीर आजार होणे किंवा मृत्यू होण्याची शक्यताही असते, अशी माहिती पोलिसांनी दिली.
कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपीकडून 67,452 रुपये किमतीचा इंजेक्शनचा साठा जप्त केला आहे. जप्त केलेल्या औषधांबाबत अधिक तपास सुरू असून ही औषधे कुठून आणली जात होती आणि कोणाला विकली जात होती, याचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वाकड पोलीस करत असून अवैध औषध विक्रीच्या रॅकेटचा तपास करण्याच्या दृष्टीने पोलिसांनी तपासाची चक्रे अधिक वेगाने फिरवली आहेत.







