Pune Crime: पुणे : पुणे शहरात गुन्हेगारा काही संपतच नाही, अशातच केवळ आर्थिक वादातून 31 वर्षीय तरुणाचे अपहरण करून त्याला विवस्त्र करत अमानुष मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यानंतर पीडिताचा व्हिडिओ काढून त्याच्यावर गोळीबार केल्याचा प्रकार समोर आल्याने शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. Pune Crime

पीडित तरुण हा वाहन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतो. 31 डिसेंबर रोजी रात्री जुन्या आर्थिक व्यवहाराच्या वादातून 9 जणांनी त्याला अडवले. आरोपींनी त्याला जबरदस्तीने कारमध्ये बसवून अपहरण केले. त्यानंतर गोकुळनगर परिसरातील एका निर्जन मैदानात नेऊन त्याला विवस्त्र करण्यात आले. येथे आरोपींनी त्याला बेदम मारहाण केली. या संपूर्ण प्रकाराचे मोबाईलवर चित्रीकरण करून पोलिसांत तक्रार दिल्यास व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली.
दहशत निर्माण करण्यासाठी आरोपींनी पिस्तुलाचा धाक दाखवला आणि गोळीबारही केला. सुदैवाने या गोळीबारात तरुण बचावला. मात्र, या घटनेनंतर तो प्रचंड मानसिक तणावात होता. अखेर रविवारी त्याने येवलेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमर काळंगे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. पोलिसांनी या प्रकरणात एकूण 9 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पोलीस उपनिरीक्षक खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींचा शोध सुरू आहे.
पुणे शहरात गेल्या काही काळापासून किरकोळ वादातून होणारे खून आणि प्राणघातक हल्ल्यांच्या घटना वाढताना दिसत आहेत. मागील वर्षात शहरात 79 खून आणि 153 खुनाच्या प्रयत्नांचे गुन्हे नोंदवले गेले आहेत. गुन्ह्यांचे प्रमाण कागदोपत्री कमी झाल्याचे दिसत असले तरी भररस्त्यात घडणाऱ्या हिंसक घटनांमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे.







