पुणे: महाराष्ट्रातील (e-NAM Maharashtra) शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी असून राज्यातील १६ मोठ्या बाजार समित्यांना लवकरच राष्ट्रीय दर्जा मिळणार आहे. राज्य सरकारने या प्रक्रियेला वेग दिला असून विधी व न्याय विभागाने यासंदर्भातील महत्त्वाची अधिसूचना नुकतीच जारी केली आहे. यामध्ये पुणे (ग्रामीण), सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, नाशिक, चंद्रपूर, बुलढाणा, ठाणे, जळगाव, जालना, सांगली, वाशिम, अकोला, अहिल्यानगर, नागपूर आणि लातूर यांसारख्या प्रमुख शहरांमधील बाजार समित्यांचा समावेश आहे. या समित्यांना ई-नाम प्रणालीशी जोडून तेथील कारभार अधिक पारदर्शक आणि डिजिटल करण्याचा सरकारचा मानस आहे.

नवीन नियमांनुसार ज्या बाजार समित्यांमध्ये दरवर्षी ८० हजार टनांपेक्षा जास्त शेतीमालाची आवक होते, अशा एकूण ५१ समित्यांना हा दर्जा दिला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात निवडलेल्या १६ समित्यांकडून गेल्या तीन वर्षांतील सर्व आकडेवारी पणन विभागाने मागवली असून ती शासनाकडे सादर करण्यात आली आहे. या प्रक्रियेमुळे आता स्थानिक बाजारपेठा राष्ट्रीय स्तरावर जोडल्या जाणार असून खरेदी-विक्रीच्या व्यवहारात मोठी सुधारणा होणार आहे.
या निर्णयाचा सर्वात मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे कारण ई-नाममुळे त्यांना त्यांच्या मालासाठी देशभरातील खरेदीदार उपलब्ध होतील. यामुळे लिलाव प्रक्रियेत पारदर्शकता येईल आणि शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला मिळण्यास मदत होईल. तसेच व्यापाऱ्यांसाठी संपूर्ण देशात एकच परवाना लागू होणार असल्याने शेतीमालाची ने-आण आणि व्यापार करणे अधिक सोपे होईल.







