Pune Crime : पुणे : पुणे जिल्ह्यातील शिरूर (Shirur) तालुक्यात मोबाईल ॲपच्या (Mobile App) मदतीने बेकायदेशीररीत्या गर्भलिंग निदान (Fetal gender diagnosis) करणाऱ्या एका टोळीचा प्रशासनाने पर्दाफाश केला आहे. आरोग्य विभाग आणि गुन्हे शाखेच्या पथकाने ढोकसांगवी येथील लाईफ केअर हॉस्पिटलवर छापा टाकून ही मोठी कारवाई केली. या प्रकरणी बीएएमएस डॉक्टर आकाश सुभाष मलगुंडे आणि एजंट नरेंद्र ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाचंगे वस्ती परिसरात असलेल्या या रुग्णालयात गर्भलिंग निदानाचे काळे कृत्य सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाला मिळाली होती. या माहितीची खात्री करण्यासाठी प्रशासनाने एक सापळा रचला. यामध्ये वाघोली पोलीस ठाण्यातील महिला पोलीस कर्मचारी प्रतीक्षा पानसरे यांनी डमी रुग्ण बनून रुग्णालयात प्रवेश केला. त्यांच्या मदतीने या संपूर्ण बेकायदेशीर व्यवहाराचे पुरावे पथकाच्या हाती लागले.
धक्कादायक माहिती पोलिसांच्या हाती
या कारवाईत समोर आलेली सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, गर्भलिंग निदानासाठी कोणत्याही पारंपारिक मोठ्या मशीनचा वापर न करता चक्क मोबाईल ॲपचा वापर केला जात होता. केसनंद येथील एजंट नरेंद्र ठाकरे याच्या माध्यमातून हे रॅकेट चालवले जात होते. मोबाईल तंत्रज्ञानाचा असा गैरवापर पाहून तपास पथकही चक्रावून गेले. तपासणीदरम्यान रुग्णालयात गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या बेकायदेशीर गोळ्यांचा मोठा साठा आणि आक्षेपार्ह कागदपत्रे आढळून आली आहेत. पोलिसांनी रुग्णालयातील सर्व साहित्य जप्त करून क्लिनिक सील केले आहे.
ही धाडसी कारवाई पुणे आरोग्य मंडळाचे उपसंचालक डॉ. भगवान पवार आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागनाथ येम्पल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आली. जिल्हा प्रशासनाने या घटनेनंतर कडक इशारा दिला असून गर्भलिंग निदान करणे हा कायद्याने गंभीर गुन्हा असल्याचे स्पष्ट केले आहे. अशा प्रकारच्या बेकायदेशीर कामात सहभागी असलेल्या लोकांची गय केली जाणार नाही, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.





