पुणे: बांगलादेशी युवतीला ब्युटी पार्लरमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवत भारतात आणल्यानंतर तिच्यावर वेश्याव्यवसायासाठी दबाव टाकल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. पीडितेने नकार दिल्यानंतर तिला खोलीत डांबून पट्ट्याने मारहाण करण्यात आली. पुण्यातील सहकारनगर पोलिसांनी एका सामाजिक संस्थेच्या मदतीने कारवाई करत युवतीची सुटका केली असून, दोन आरोपींना अटक केली आहे.

याप्रकरणी अभिषेक संथेबेन्नूर, तमन्ना शेख, रकीब खान यांच्याविरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायदा (PITA), बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा (POCSO), आणि पारपत्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अभिषेक आणि तमन्ना यांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित युवती ही आरोपी तमन्ना शेख हिच्या ओळखीची आहे. तिने ब्युटी पार्लरमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवत तिला भारतात आणले. बंगळुरू येथे आरोपी रकीब खान याच्याकडे काही काळ ठेवून, पुढे तिला पुण्यात पाठवण्यात आले. मात्र, येथे येताच तिला जबरदस्तीने बुधवार पेठेतील कुंटणखान्यात नेले गेले आणि वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले गेले.
पीडितेच्या नकारानंतर आरोपी अभिषेक संथेबेन्नूर व तमन्ना शेख यांनी तिला सहकारनगर परिसरातील एका खोलीत डांबून ठेवले आणि पट्ट्याने बेदम मारहाण केली. या प्रकाराची माहिती युवतीने मोबाइलच्या माध्यमातून थेट बांगलादेशातील पोलिसांना दिली. तेथील पोलिसांनी पुण्यातील एका सामाजिक संस्थेशी संपर्क साधला.
सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी तात्काळ सहकारनगर पोलिसांशी संपर्क केला. पोलीस निरीक्षक सुरेखा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पथकाने शोधमोहिम राबवत शुक्रवारी रात्री दोन आरोपींना अटक केली आणि युवतीची सुटका करण्यात आली.







