Pune Crime: पुणे: सोन्या-चांदीच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्याने दागिन्यांशी संबंधित चोरीच्या (Theft) घटनांमध्येही वाढ होताना दिसत आहे. पुण्यातील गजबजलेल्या रविवार पेठ परिसरात अशीच एक घटना समोर आली असून, एका सराफा व्यावसायिकाच्या विश्वासाला तडा गेला आहे. त्यांच्याकडे काम करणाऱ्या कारागिरानेच चांदीचे मौल्यवान मुखवटे चोरल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे.

हेही वाचा- ‘1 कोटी तयार ठेव, नाहीतर…’शेतकऱ्याचं दिवसाढवळ्या अपहरण; ‘त्या’ कॉलने पोलीसही चक्रावले
रविवार पेठ ही पुण्यातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांची मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. येथील एका सराफा व्यावसायिकाकडे शिवलाल लोहार वय 34 हा कारागीर म्हणून काम करत होता. व्यावसायिक देवदेवतांचे चांदीचे मुखवटे तयार करण्याचे काम करतात. या कामासाठी त्यांनी शिवलालवर विश्वास ठेवून त्याच्याकडे चांदीचे मुखवटे घडवण्याची जबाबदारी दिली होती.
मात्र, शिवलाल लोहारने मालकाचे लक्ष नसल्याची संधी साधली. कामाच्या नावाखाली त्याने चांदीचे दोन मुखवटे चोरले. या मुखवट्यांची एकूण किंमत सुमारे 1 लाख 40 हजार रुपये इतकी असल्याचे सांगण्यात येत आहे. काही वेळाने चांदीचे मुखवटे आढळून न आल्याने व्यावसायिकाला चोरीचा संशय आला. त्यांनी तात्काळ दुकानातील तपासणी केली असता मुखवटे गायब असल्याचे स्पष्ट झाले.
या घटनेनंतर संबंधित सराफा व्यावसायिकाने खडक पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. फिर्यादीच्या आधारे पोलिसांनी शिवलाल लोहार याच्याविरोधात चोरीचा गुन्हा नोंदवला आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला असून तो राजस्थानमधील उदयपूर येथे आपल्या गावी पळून गेल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार हर्षल दुडम करत असून आरोपीचा शोध घेण्यासाठी तांत्रिक तपास सुरू आहे. या घटनेमुळे सराफा व्यावसायिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.






