पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहरात राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यासाठी एक धोक्याची घंटा वाजली आहे. गेल्या काही दिवसांपासून या भागातील प्रदूषणात प्रचंड वाढ झाली असून हवेचा दर्जा अत्यंत खालावला आहे. विशेषतः वाकड आणि हिंजवडी या आयटी हबच्या परिसरात हवा श्वास घेण्यालायक राहिलेली नाही. येथील भूमकर चौक परिसरात हवेचा गुणवत्ता निर्देशांक 300 च्या वर गेला असून ही स्थिती मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक मानली जाते.

शहरातील या वाढत्या धुराला आणि धुळीला काही प्रमुख गोष्टी कारणीभूत ठरत आहेत. हिंजवडी आणि वाकड पट्ट्यात सध्या मोठ्या प्रमाणावर घरांची आणि व्यापारी संकुलांची बांधकामे सुरू आहेत, ज्यामुळे वातावरणात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. तसेच सिमेंट काँक्रीट तयार करणाऱ्या प्रकल्पांतून निघणारी धूळ आणि महामार्गावर होणाऱ्या वाहनांच्या प्रचंड कोंडीमुळे हवेत विषारी वायू मिसळत आहेत. आकडेवारीनुसार, पुण्याचा प्रदूषणाचा आकडा 220 वरून आता 232 पर्यंत वाढला असून, वाकडमध्ये तर हा निर्देशांक 307 च्या धोकादायक पातळीवर पोहोचला आहे.
या प्रदूषित हवेमुळे नागरिकांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. केवळ वृद्ध आणि लहान मुलेच नाही, तर तरुण मंडळींनाही खोकला, डोळ्यांची जळजळ आणि दम लागण्यासारखे त्रास जाणवू लागले आहेत. तज्ज्ञांनी इशारा दिला आहे की, अशा वातावरणात दीर्घकाळ राहिल्यास फुफ्फुसांचे कायमस्वरूपी आजार होऊ शकतात. त्यामुळे या भागात राहणाऱ्या लोकांनी घराबाहेर पडताना काळजी घेणे आवश्यक झाले आहे.







