Crime News : विरारमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली असून, कौटुंबिक वादातून एका ३५ वर्षीय विवाहित महिलेची हत्या झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात पोलिसांनी महिलेच्या पतीसह नणंदेला अटक केली आहे.

विरार पश्चिमेतील एम. बी. ईस्टेट परिसरातील संगम सोसायटीमध्ये कल्पना सोनी (३५) ही पती महेश सोनी (३८) आणि कुटुंबीयांसोबत राहत होती. लग्नानंतरपासूनच सासरच्या मंडळींकडून तिला शारीरिक आणि मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप आहे. याच कारणामुळे पती-पत्नी आणि कुटुंबीयांमध्ये वारंवार वाद होत होते. (Crime News)
शनिवारी सकाळीही कल्पना आणि महेश यांच्यात वाद झाला. या वादानंतर कल्पनाने घर सोडण्याचा निर्णय घेतला आणि पतीकडे तिचं स्त्रीधन परत मागितलं. याचवेळी महेश सोनी आणि त्याची बहीण दिपाली सोनी (३५) यांनी मिळून कल्पनावर हल्ला केल्याचा आरोप आहे. या मारहाणीत कल्पनाचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच बोळींज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३ (१) अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी पती महेश सोनी आणि नणंद दिपाली सोनी यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.







