पुणे: पौड पोलिस ठाण्यातील (Pune Bribe News) सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकावर 35 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ कारवाई करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सायंकाळी सुमारे 5.40 वाजता सापळा रचून ही कारवाई केली. (Pune Crime)

सचिन बाळासाहेब शिंदे (वय 45), सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक, पौड पोलिस ठाणे (पुणे ग्रामीण) असे अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. ते सध्या सुसगाव, ता. मुळशी येथे वास्तव्यास आहेत.
तक्रारदार 45 वर्षीय पुरुष असून त्यांच्या विरोधात पौड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात जप्त केलेले वाहन परत न करण्यासाठी आणि तपासात मदत करण्याच्या मोबदल्यात शिंदे यांनी सुरुवातीला 1 लाख रुपयांची लाच मागितल्याची तक्रार 18 फेब्रुवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. पडताळणीदरम्यान 1 लाख रुपयांवरून तडजोड करून 35 हजार रुपये देण्याचे ठरले.
20 फेब्रुवारी रोजी मुळशी बीट कार्यालय, पौड पोलिस ठाणे येथे सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून 35 हजार रुपये स्वीकारताना शिंदे यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 च्या कलम 7 अंतर्गत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे आणि अपर पोलिस अधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.







