अमित मुंडीक

पुणे: आगामी महानगरपालिका निवडणूक 2026 शांततेत आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी पुणे शहर पोलीस प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. परिमंडळ-1 अंतर्गत खडक, डेक्कन आणि फरासखाना पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रातील गंभीर गुन्हे, अंमली पदार्थ तस्करी तसेच मकोका अंतर्गत गुन्ह्यांमध्ये सहभाग असलेल्या एकूण 9 सराईत आरोपींवर प्रतिबंधक कारवाई करत त्यांना 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे. (PMC Election)
महानगरपालिका निवडणुकीदरम्यान सराईत गुन्हेगारांचा प्रभाव राहू नये, निवडणूक प्रक्रिया भयमुक्त आणि सुरळीत पार पडावी तसेच सामान्य नागरिकांना निर्भयपणे मतदान करता यावे, या उद्देशाने ही कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त पुणे शहर अमितेश कुमार यांनी दिलेल्या आदेशानुसार भारतीय नागरिक सुरक्षा संहिता सन 2023 च्या कलम 129 अन्वये ही प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे.
न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व आरोपींना 14 दिवसांसाठी येरवडा मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह-आयुक्त रंजनकुमार शर्मा आणि अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) राजेश बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उप आयुक्त परिमंडळ-1 पुणे शहर कृषिकेश रावले यांच्या नेतृत्वाखाली पार पाडण्यात आली आहे.







